यश कुणालाही कधी सहज मिळत नाही. ध्येय्याच्या वाटेवरून चालताना अनेक प्रकारच्या काट्या - कुट्यांचा, नदी - नाल्यांचा आणि डोंगर - दर्यांचा सामना हा प्रत्येकालाच करावा लागतो. तेव्हा कुठे 'यशाचा दिवस' पाहता येतो. मात्र त्या दिवसासाठी अनेक रात्रींचे 'दिवस' करावे लागतात. दिवस - रात्र मेहनत करावी लागते. प्रामाणिकपणा जपावा लागतो. *परीश्रम, त्याग आणि समर्पण या त्रिसुत्रीवरच यशाचा दिवस पाहायला मिळतो.* शरद नगर उभारताना या सर्व बाबींचा अनुभव खुपच जवळून घेतला. अनेक संकटांना सामोरे गेलो. आलेल्या सर्व बऱ्या - वाईट प्रसंगांना निर्धाराने तोंड दिलं आणि खचुन न जाता प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर अखेर स्वप्न पूर्ण केलं.
आज जे छोटंसं का होईना पण *'शरद नगर'* उभं राहिलयं ते उभं करणं एवढं सोप्पं वा सहज शक्य नव्हतं. पण सर्वच प्रकारच्या संकटांवर मात करत ते शक्य करून दाखवलं. खरंतर पिक सारख्या छोट्याशा खेड्यातून वाडा शहरात आलो तेव्हा डोळ्यामधे मोठी स्वप्न साठवली होती. *"गरीबीमधे जन्माला आलो असलो तरी गरीबीमधेच मरायचे नाही आणि थोडसं का होईना पण नाव कमवायचं,"* असं मनाशी पक्क ठरवलं होतं. शहरात येताना एकच अंगावरचा ड्रेस, दोन टोपं व एक ताट एवढंच भांडवल होतं. या एवढ्याशा भांडवलावरच मोठी - मोठी स्वप्न पाहिली. त्यामधलं एक स्वप्न होतं, स्वतःच्या नावाचं नगर उभारणं. १९९० मधे स्वप्न पाहिलं आणि ते २०२५ मधे पूर्ण केलं.
शहरात आल्यापासूनच डोळ्यामधे शरद नगर उभारण्याचं स्वप्न फेर धरून पिंगा घालत होतं. त्यासाठी प्राथमीक तयारी आम्ही केली होती. बिल्डींग क्षेत्रातील ज्ञान मिळवणं सुरू होतं. मात्र प्रत्यक्षात काम केल्याशिवाय खरी माहिती मिळणार नव्हती. म्हणून मग अन्य व्यवसाय करता - करताच बिल्डरांच्या साईटवर जाणं सुरू केलं. खास अनुभवासाठी एका बिल्डरच्या साईटवर सुपरवायझर म्हणून वर्षभर काम केलं. पत्रकारीतेमधे चांगलं नाव कमावलं होतं. *'शब्द मशाल'* हे वृत्तपत्र तुफान चालत होतं. माझं धाडस आणि जिद्द पाहून एका श्रीमंत व्यापाऱ्याने मला त्याच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामधे पार्टनर घेतलं. त्याने पैसे लावायचे, मी साईटसह इतर सर्व कामे करणार. ही माझ्या दृष्टीने खुप मोठी संधी होती. एक पूर्ण इमारत कशी उभी राहते, याचे प्रात्यक्षीकच पाहायला मिळणार होते. मी सुरुवात केली आणि मागे वळुन पाहिलेच नाही. नंतर २००० साली स्वतःचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला.
छोट्या - मोठ्या बिल्डींग बांधायला सुरुवात केली आणि त्याच वेळी स्वतःच्या नगराची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पहिली बिल्डींग *'यशवंत नगर'* मधे तीही शहराच्या बाहेर एका शेतामधे बांधली. बिल्डींग व्यवसायामधे नाव झालेलं असल्याने चांगला प्रतिसाद मिळाला आणि 'यशवंत नगर' ची पायाभरणी सुरळीतपणे पार पडली.आज हे नगरही मोठ्ठं झालं आहे. *'यशवंत नगर' मधे पहिली स्वतःची छाप उठवणारी 'यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स' ही दिमाखदार बिल्डींग अल्पावधीतच उभी राहिल्याने 'बिल्डर' म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि तेव्हाच शरद नगरच्या उभारणीचा संकल्प मनामधे पक्का केला.*
'शरद नगर' उभारताना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना डोक्यामधे घोळत होत्या. त्यादृष्टीने एक स्वतंत्र ऐस-पैस जागा हवी होती. ती जागा ऐनशेत रोडला मिळाली. ऐनशेत हे माझ्या मामांचेच गांव. त्यामुळे तत्काळ होकार दिला. आणि दि. २४ ऑगस्ट २००६ रोजी जमिनीचे रजिस्ट्रेशन झाले. *वाडा शहरातील आगरी समाजाचे काशिनाथ चाहु पाटील यांची ती जागा. त्यांच्या मृत्यूनंतर २२ खातेदार सातबाऱ्यावर चढलेले. त्यामुळे मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करत मदन काशिनाथ पाटील, अशोक काशिनाथ पाटील, नाना काशिनाथ पाटील, गोदावरी पांडुरंग गोतरणे, शांता कृष्णा पाटील व ठमा गोपाळ पाटील* यांच्यासह अन्य खातेदारांनी सह्या करून जमीन माझ्या नावावर करून दिली. त्यावेळी त्या जागेवर काट्या-कुट्यांनी वेढलेले , झाडा- झुडपांनी भरलेलं मोकळं माळरान होतं. माझ्या व्यतिरीक्त कुणीही ती जागा घेण्याचा विचारही केला नव्हता.
*'शरद नगर'* उभारण्याच्या वेडेपणामुळे मी मोठ्या धाडसाने निर्णय घेतला. पण २००६ पासून जमीन NA करून हातात येईपर्यंत २०१० साल उजाडले. अनेक संकट आली. सर्व संकटांवर मात करत दि.८ मे २०१० रोजी शरद नगरच्या उभारणीस प्रत्यक्षात सुरुवात केली. मोठा गाजावाजा करत ऐनशेत रोड वरील 'वर्सीच्या माळाची' साफसफाई करून त्या जागेवर 'बॅनर' लावण्याचा अर्थात प्रोजेक्ट लॉंच करण्याचा मुहूर्त काढला. मात्र निमंत्रण देऊनही कुणी आलं नाही. *माझी आई, पत्नी, दोन छोटी मुलं, आर्किटेक महेश जाधव,सहकारी राम पाटील व बंड्या सुर्वे व ज्याला काम दिलं होतं तो किशोर जयसिंग नावाचा ठेकेदार व दोन कामगार यांच्या उपस्थीतीमधे कुटूंबीयांसह बॅनर लावून प्रोजेक्ट लॉंच केला. आईच्या व मुलांच्या हस्ते नारळ फोडून मुहूर्त केला. एकूणच कार्यक्रमाचा फज्जा उडाला होता.* "मोकळ्या माळरानावर, शहराच्या बाहेर नगर उभच राहू शकत नाही, शरद पाटीलला वेड लागलयं," अशा प्रतिक्रीया व्यक्त होत होत्या. मी मात्र ठाम होतो. यश मिळेलच याची खात्री होती आणि *"जाऊन - जाऊन आपलं काय जाणार ? आपल्याकडे होतचं काय ?"* हाही विचार मनामधे होता, म्हणूनच खचुन न जाता अगदी शून्यातून सुरुवात केली.
मोठ्या प्रयत्नांनी दि. २९ नोव्हेंबर २०१० रोजी वाडा ग्रामपंचायतीची पहिल्या बिल्डींगची परवानगी मिळवली. *शिवसेनेचे त्यावेळचे प्रमुख नेते निलेश गंधे व सरपंच गिरीष कडू* यांनी त्यासाठी सहकार्य केलं. शनिवार दि. १ जानेवारी २०११ रोजी राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स या पहिल्या बिल्डींगचे भूमिपूजन केले आणि शरद नगरच्या उभारणीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. स्वप्न पाहिले १९९० मधे आणि सुरुवात केली २०११ मधे. म्हणजे तब्बल २१ वर्ष लागली सुरुवात व्हायला. गरीबांची स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागतोच. हा २१ वर्षांचा काळ खडतर होता. अत्यंत वाईट होता. *खिशात काहिही नसताना गरीबांच्या पोरांच्या नशिबामधे जे - जे येतं, ते सगळं भोगुन झालं होतं. लढून - भिडून - नडून इथपर्यंत पोहोचलो होतो.* आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. मग पुढे आणि पुढेच जात राहिलो. २०११ ते २०२५ हा १४ वर्षांचा काळावधी आठवला की अंगावर आजही शहारे येतात.१२ वर्षाचे ' तप ' आणि २ वर्ष कोरोना कालावधीतला ' वनवास ' असा तो खडतर काळ होता.
या १४ वर्षांमधे जे - जे अनुभवलं ते भयानक व भयावह असे होते. मात्र सुरुवातीला गमावण्यासारखं जवळ काहीच नव्हतं, त्यामुळे *'जाऊन - जाऊन आपलं काय जाणार,'* हाच मंत्र सतत घोकत होतो. आलेल्या संकटांना परतवून लावत होतो. शहरामधे आज पर्यंत कुणीही स्वतःच्या नावाचं नगर उभारलं नव्हतं. त्यामुळे जस - जशी एक - एक बिल्डींग उभी राहत होती तस - तशी जळणाऱ्यांची आणि नको ते बोलणाऱ्यांची संख्या वाढत होती. मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जात होत्या. चौकशा होत होत्या. हे सुरुवातीलाच माहित होतं, म्हणून पायाभरणी करतानाच 'खोटं व चुकीचं' काहीही करायचं नाही, असं ठरवलं होतं. त्यामुळे *चौकशांमधे काहीही निष्पन्न होत नव्हतं. पै - पैशाचा हिशोब ठेवत होतो. टॅक्स प्रामाणिकपणे भरत होतो. नियमामधे जे असेल तेच करत होतो. तरीही त्रास देणं सुरूच होतं मात्र सर्वांना पुरून उरलो. कुठेही सापडलो नाही.*
आत्तापर्यंत वाडा शहराच्या इतिहासामधे कुठल्याच बिल्डरची कागदपत्र माहितीच्या अधिकारामधे जेवढ्या वेळी मागितली नसतील तेवढ्या वेळी शरद नगरची कागदपत्र ग्रामपंचायतीकडून व नंतर नगरपंचायतीकडून मागितली गेलीत. विशेष म्हणजे इतर बिल्डरांची कागदपत्र द्यायला अधिकारी टाळाटाळ करतात. पण शरद नगरची कागदपत्र अर्ज दाखल केल्या- केल्याच दिली जातात. कुणी तरी काही तरी चुकीचे शोधेल अशी भाबडी आशा अधिकाऱ्यांना असते. आत्ता तर सर्व काही ऑनलाईन झाल्याने व रेरा कायदा आल्याने खऱ्या बिल्डरांना कुठलीच भीती उरलेली नाही. माझ्यासारख्या बिल्डरंना तर भीती वाटायचा प्रश्नच येत नाही. सुरुवातीला मात्र खूप त्रास झाला. विनाकारण त्रास देण्याचाही प्रयत्न झाला. अनेक संकट आली. सर्व संकटांना अंगा- खांद्यावर खेळवलं आणि शरद नगर उभं केलं.
बिल्डर आणि पत्रकारीता हे दोन्ही वेगळे विषय. मी मात्र दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावत असल्याने आणि *सातत्याने बेधडक - बिनधास्तपणे लिखाण करत असल्याने शत्रूंची संख्या झपाट्याने वाढत होती. पत्रकारीतेमुळे अनेकांशी शत्रुत्व पत्करले होते.* हे शत्रू, जळणारी लोकं आणि प्रतिस्पर्धी व्यवसायिक हे व्यक्तीशः माझ्या विरोधात काहीही करता येत नसल्याने 'शरद नगर' वरच सर्वजण घसरत होते. गेल्या १४ वर्षात शरद नगरच्या व माझ्या एवढ्या वेळा चौकशा झाल्यात की, आता त्या तक्रारीचे आणि चौकशांचे काहीही वाटेनासे झाले आहे. उलट कुणी तक्रार केली नाही तर चुकल्यासारखे वाटते.
*व्यवसायामधे आपल्या जेवढे शत्रू जास्त तेवढे आपण सावध असतो. चुकीचं काही करण्याचा विचारही आपल्या मनामधे येत नाही.* विरोधक छोटीशी का होईना, पण चूक शोधतच असतात. त्यामुळे पावला - पावलांवर आपण सावध राहतो. म्हणूनच व्यवसायात एकतर शत्रू करू नये आणि केले तर चुका करू नयेत. मी पत्रकार असल्याने रोज नव - नवीन शत्रू निर्माण करत होतो. मात्र त्याचवेळी खुपच सावध राहून व्यवसायही करत होतो. तरीही अनेकांनी घेरण्याचा प्रयत्न केला, पण यश कुणालाच आले नाही.
शरद नगरची सर्वात मोठी कसोटी ही नगरपंचायत झाल्यानंतरची होती. वाडा नगरपंचायतीमधे नवे मुख्याधिकारी नियुक्त झाले होते. त्यांनी शहरातील बिल्डरांना त्रास देऊन पैसे उकळणे सुरू केले होते. शहरातील नगरसेवकांची त्यांना साथ होती. शहरातील अनाधिकृत बांधकाम धारकांना धमकावून वसुली जोरात सुरू होती. मी पत्रकार होतोच पण बिल्डरही होतो आणि शहरातील बिल्डरांचे नेतृत्वही करत होतो. त्यामुळे या वसुली विरुद्ध २०१९ मधे खुला आवाज उठवला. 'मशाल' चॅनल मधुन वाभाडे काढले. नगरपंचायती विरुद्ध लढण्याची हिम्मत कोणताच बिल्डर दाखवू शकत नव्हता. मी मात्र लढत होतो. *'त्या' मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील ६५ बिल्डींग बांधकामांना अनाधिकृत ठरवून नोटीसा दिल्या होत्या. मात्र शरद नगर मधील एकाही बिल्डींगला नोटीस देता आली नव्हती.* त्यामुळे सर्वांच्याच नजरा शरद नगरकडे होत्या. मुख्याधिकारीही विरोधात गेले होते. त्यांनी शरद नगरची सर्व कागदपत्रे दहा - दहा वेळा तपासली, मात्र कुठेही काही सापडले नाही. शेवटी मुख्याधिकाऱ्यांनी शरद नगरमधे येऊन दिलेल्या परवाणगी नुसार बिल्डींग बांधल्या आहेत का ? याची तपासणी केली. सर्व नियम पाळलेले आहेत, बांधकाम नियमानुसारच आहे, हे पाहुन हतबल झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी हात टेकले. *त्यावेळी जर का इतर बिल्डरांप्रमाणे कुठल्यातरी चुकीमधे सापडलो असतो तर माझ्या विरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक एक झाले असते, आधीच विरोधात असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी बिल्डींग तोडायलाच लावली असती.* मात्र कुठलीच चूक नसल्याने मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध लढलो आणि जिंकलोही.
व्यवसाय सुरू करताच काही नियम स्वतःसाठी लावून घेतले होते. *"एकही चूक करायची नाही आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करायचे,"* हे ठरवूनच व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे कितीही तक्रारी झाल्या तरी कुठेही सापडलो नाही. मात्र कोरोनाने मोठा दणका दिला. कोरोनाचे महाकाय संकट सर्वच व्यवसायांवर घोंगावत होते. सर्वच काम - धंदे बंद झाले होते. 'शरद नगर' ही अपवाद नव्हते. नाईलाजास्तव काम बंद करताना डोळे भरून आले. कुठलीही चुक नसताना शरद नगर मधील सहाव्या बिल्डींगचे काम बंद पडले होते. या कोरोनाच्या तडाख्यामधे बरेचसे व्यवसायिक कायमचे झोपले. अनेकांचे धंदे बंद झाले. ते खुपच मोठे संकट होते. मात्र अनुभव व मेहनतीच्या जोरावर पुन्हा उभा राहिलो. ग्राहकांचा कमावलेला विश्वास कामाला आला आणि कोरोना संपताच पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागलो.
गेल्या १४ वर्षात *शरद नगर* उभारताना अनेक संकटं आली. नको त्या आणि नको तेवढ्या चौकशा झाल्या या सर्व संकटांमधून तावून - सुलाखून निघालो होतो. त्यामुळे *'कोरोना'* सारखे संकटही लिलया पेलले. आता 'कोरोना' पेक्षा मोठे संकट येणे अशक्यच. त्यामुळे शरद नगरची वाटचाल यापुढेही सर्व संकटांच्या छाताडावर उभे राहून यशस्वीपणे सुरूच राहील.
*• शरद यशवंत पाटील*
*संस्थापक , शरद नगर, वाडा,*
*जि. पालघर.*
*(M) 8600001111*
COMMENTS