शरद यशवंत पाटील दि. १८/०७/२०२५
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या शिवसेनेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रात जिल्हा परीषदेचा पहिला अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या रूपाने पालघर जिल्हा परीषदेवर बसवला. त्यासाठी त्यांनी 'जे - जे' करायचे होते ते 'सर्वकाही' खुलेआम केले. आता तेच 'सर्वकाही' करून जिल्हा परीषद ताब्यात घेण्याची तयारी भाजपाने केली आहे; आणि त्याची सुत्र पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे आहेत. ते काय चमत्कार घडवणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गणेश नाईक हे शिवसेनेत असताना एक मातब्बर व प्रभावी नेते होते. त्यांचा महाराष्ट्रभर दबदबा होता. शिवसेना सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमधे गेल्यानंतरही त्यांचा तोच प्रभाव व दबदबा कायम राहिला. आता भाजपामधे आल्यानंतरही त्यांचा आलेख चढताच आहे. भाजपाच्या मुख्यवर्तुळात त्यांना मानाचे स्थान आहे. एक 'सच्चा नेता' व 'नॉन करप्टेड' लोकप्रतिनीधी म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. कुणाला कधीही जमणार नाही, अशी काम करण्याची त्यांची खाशियत आहेत, त्यामुळे ते कमालीचे लोकप्रिय आहेत. मंत्रीमंडळात वर्णि लागल्यानंतर त्यांची अफाट कार्यक्षमता पाहुन त्यांच्याकडे एखाद्या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल, असे वाटत असतानाच पालघर सारख्या छोट्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आले. तक्रार न करणे व दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी जिल्ह्याची सुत्र हाती घेतली आणि झपाटल्यागत कामाला सुरुवात केली.
गणेश नाईक हे भाजपाचे असले तरी ते 'सर्वपक्षीय नेते' आहेत. त्यांच्या लोकप्रियतेने व स्वभावाने त्यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आपलेसे केले. ते कधीही जात - धर्म - पंथ पाहत नाहीत. कुठलाच भेदभाव कुणाशी करत नाहीत. त्यामुळे त्यांची 'सर्वपक्षीय छबी' जिल्ह्यामधे लोकप्रिय ठरली. लोकं मोठ्या संख्येने व अपेक्षने त्यांच्याकडे येत राहिली. ते नि:पक्षपणे न्याय देत राहिले. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामधे 'गणेश नाईक' हे नाव सर्वांना आपले जवळचे वाटते. त्यांच्या याच 'सर्वपक्षीय लोकप्रियतेचा' फायदा भाजपाला होईल का ? ते जिल्ह्यामधे 'कमळ' फुलवतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपासाठी पालघर जिल्ह्याची जमीन 'सुपीक' आहे. रविंद्र चव्हाण हे पालकमंत्री असताना त्यांनी 'विशिष्ट प्रकारचा' पाऊस पाडून चांगल्या प्रकारचे 'सिंचन' केले आहे. या जिल्ह्यातील सर्वांचीच 'औकात' व 'किंमत' माहित असल्याने निवडणूकांमधे औकात पाहून किंमत मोजून लोकसभा व विधानसभा निवडणूकीमधे या पडीक जमिनीमधे 'कमळ' फुलवण्यात ते यशस्वी झाले होते. साम, दाम, दंड, भेद या चारही नितींचा सर्रास वापर करत त्यांनी यश मिळवले. मागील ५ वर्षांमधे जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार नव्हता. आज स्नेहाताई दुबे, राजन नाईक व हरिश्चंद्र भोये यांच्या रूपाने तिन आमदार आहेत. पूर्ण जिल्ह्याला एकच खासदार आहे, तोही भाजपाचाच आहे. काहीही नसताना रविंद्र चव्हाण यांनी पालघर जिल्ह्यामधे मोठ्या क्षमतेने 'कमळ' फुलवले. आता ते प्रदेश अध्यक्ष आहेत आणि या जिल्ह्यावर त्यांचे 'विशेष प्रेम' आहे. त्याचाही मोठा फायदा भाजपाला होणार आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी वर्षभरामधे केलेले काम प्रचंड आहे. मतदारांचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी मोठं यश मिळवलं आहे.
गणेश नाईक यांच्या दृष्टीने या सर्व जमेच्या बाजु असल्या तरीही जिल्हा परीषद निवडणूकांमधे नेमकं काय घडेल ? हे आजच सांगता येणं कठीण आहे. मागील जिल्हा परीषद निवडणूकांमधे भाजपाला ५७ पैकी फक्त १२ जागांवरच यश मिळालं होतं. जव्हार ही एकच पंचायत समिती ताब्यात आली होती. नगरपरीषद व नगरपंचायतींमधे डहाणू वगळता फारसं यश मिळालं नव्हतं. यावेळची परीस्थिती खुपच वेगळी आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष फुटले आहेत. भाजपाचे विरोधक विखुरलेले आहेत. महाविकास आघाडी जिल्ह्यामधे किती मोठं आव्हान उभी करू शकेल ? यावर पुढची गणितं अवलंबून असली तरीही भाजपाला खरे आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच आहे. खरी लढत ही याच शिवसेना आणि भाजपामधे होणार आहे. युतीच्या कुणी कितीही गप्पा मारत असले तरीही पालघर जिल्ह्यामधे शिवसेना - भाजपा युती होणं हे अशक्यच वाटते. म्हणूनच गणेश नाईक यांची खरी कसोटी ही या त्यांच्या जिल्ह्यातील पहिल्याच निवडणूकीमधे लागणार आहे.
खरं तर पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतरची व पालकमंत्री झाल्या नंतरची ही गणेश नाईक यांची पहिली निवडणूक असली तरीही जिल्हा एकसंघ असताना ते सलग १५ वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीमधे त्यांनी आपला 'करीश्मा' निवडणूकांमधे दाखवलेला आहे. नवी मुंबई सारख्या महाकाय शहराचे ते 'अनाभिषीक्त सम्राट' आहेत. नवी मुंबई कशी जिंकायची ? याचे कला - कौशल्य, डाव-पेच त्यांना माहित आहेत, त्यांच्या दृष्टीने पालघर हा खुपच छोटा जिल्हा आहे. म्हणूनच भाजपा कार्यकर्त्यांच्या त्यांच्या कडून खुप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या बळावरच या निवडणूकीमधे जिल्ह्यात कमळ फुलवायचेच याचा चंग पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.
गणेश नाईक यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामधे अल्पावधीतच चांगले काम केले आहे. आज महाराष्ट्रातील सर्व पालकमंत्र्यांचे 'प्रगती पुस्तक' पाहिले तर त्यामधे 'नंबर - १' गणेश नाईकच ठरतील. मात्र जिल्हा परीषद निवडणूकांमधे भाजपा पक्षात ते महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावतील का ? पालघर जिल्हापरीषदेवर भाजपाचा झेंडा फडकवतील का ? पालघर जिल्ह्यातील राजकारणाचा अक्षरशः चिखल झाला आहे. या चिखलामधे 'कमळ' फुलवण्यात त्यांना यश येईल का ? या व काहीशा अशाच प्रश्नांची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. घोडा - मैदान जवळ आहे. 'ZP' चा 'रणसंग्राम' सुरू झाला आहे. मैदान कोण मारेल ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
*• शरद यशवंत पाटील*
*पत्रकार, वाडा*
*जि. पालघर.*
*(M) 8600001111*
COMMENTS