पालघर जिल्ह्यामधे ज्या तालुक्यांमध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप पर्यंत झालेले नसताना ' आधी पुनर्वसन - मग धरण ' या कायद्याची पायमल्ली करून एका पाठोपाठ एक धरणं मंजूर केली जात आहेत. या धरणांचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, या मागणीसाठी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना आज दि. १२ जून २०२६ रोजी निवेदन दिले.
या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन पालघर जिल्ह्यातील एकही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाशिवाय राहता कामा नये, त्यासाठी मंत्रालयामधे सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी व हा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश मंत्री गणेश नाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जव्हार तालुक्यामध्ये खडखड धरण बांधून पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. विक्रमगड तालुक्यातील देहर्जे धरण ७० टक्के बांधून पूर्ण झालेले आहे मात्र अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. एकाही प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झालेले नाही, असे असतानाच वाडा तालुक्यातील ओगदा येथे गारगाई धरणाचे काम सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. प्राथमिक स्तरावर या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर मधे भूमिपूजन होणार आहे. मात्र यापूर्वी एकाही प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे कायद्याप्रमाणे आधी पुनर्वसन करा , मगच धरणाच्या बांधकामाला सुरुवात करा , अशी मागणी शरद पाटील यांनी निवेदन देऊन केली आहे.
पालकमंत्री गणेश नाईक हे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरच मंत्रालयामधे बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा निघेल , अशी माहिती शरद पाटील यांनी दिली.
COMMENTS